Ranking Tennis tournament – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए मानांकन मिलिंद मारणे टेनिस अकादमी ९ व १० वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अदिरा भगत, प्रयाण ढगे, तस्मई पोहाकर, विवान डिक्कर यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
भूगाव येथील द पुना वेस्टर्न क्लब टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ८ वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अदिरा भगत हिने दुसऱ्या मानांकित युक्ता कुटेचा ७-३ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. याच मुलांच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित प्रयाण ढगेने दुसऱ्या मानांकित कियान पेंडुरकरचा ७-५ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
१० वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत पाचव्या मानांकित तस्मई पोहाकर हिने दुसऱ्या मानांकित प्रग्या जैनच टायब्रेकमध्ये ७-६(४) असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलांच्या गटात अर्जित बावसकरने सामन्यातून माघार घेतल्याने विवान डिक्करला विजयी घोषित करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण द पुना वेस्टर्न क्लबचे सदस्य प्रविण घोडे व बाळकृष्ण आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मिलिंद मारणे, पीएमडीटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी उपस्थित होते.