‘दिल्ली’नंतर आपचे नवे मिशन! ‘या’ राज्यात राबविणार केजरीवाल पॅटर्न…

नोयडा – नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांची ‘झाडूने’ सफाई करत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा ‘राजधानी’तील सत्ता राखली. केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दिल्लीकरांनी केजरीवालांच्या मागील ५ वर्षांमधील कार्यकाळावर समाधानी असल्याची पोचपावती देत ७० पैकी ६२ जागा आम आदमी पक्षाच्या पारड्यात टाकल्या.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी विखारी टीका करत केजरीवालांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केजरीवाल यांनी अखेरपर्यंत स्थानिक मुद्द्यांवरच जोर दिल्याने त्यांना यश प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे आम आदमी पक्षाच्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून पक्षाचा दिल्ली बाहेर देखील प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. अशातच आता आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार व उत्तर प्रदेश आप’चे प्रमुख संजय सिंग यांनी भविष्यात ‘अरविंद केजरीवाल यांच्या विकासाचे मॉडेल उत्तर प्रदेशामध्ये’ राबविण्यासाठी पावलं उचलणार असल्याची माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देताना सिंग म्हणाले, “उत्तर प्रदेशात येत्या २३ फेब्रुवारीपासून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ता नोंदणी शिबीर सुरु होणार असून पक्षामध्ये काम करू इच्छिणारे कार्यकर्ते नोंदणी केंद्र, मिस कॉल सेवा अथवा संकेतस्थळाद्वारे कार्यकर्ता म्हणून नोंदणी करू शकतील. नोंदणी शिबीर २३ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.”

यावेळी बोलताना संजय सिंग यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या कार्यकाळात राज्यामध्ये कायदा व सुरक्षाव्यवस्थेची अवस्था बिकट झाल्याचा आरोप केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.