मंचर- पुणे-नाशिक रस्त्यावर कळंब (ता. आंबेगाव) च्या हद्दीत भरधाव आलेल्या ट्रकने समोरून आलेल्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला आहे. राजकुमार जगन्नाथ आहेरकर (वय 33, रा. चिखली, ता. हवेली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याचे वडील जगन्नाथ पंढरीनाथ आहेरकर जखमी आहेत. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला आहे.हा अपघात सोमवारी (दि. 17) पहाटे दीड वाजता झाला.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगन्नाथ आहेरकर आणि त्यांचा मुलगा टेम्पोचालक राजकुमार आहेरकर हे टेम्पो (एमएच 14 जीयू 9554) मोशी-चिखली येथून माल घेऊन जळगाव येथे पोहोच करण्यासाठी जात होते. कळंब येथील सहाणे मळाजवळ पहाटे सव्वादोनच्या सुमारास समोरून भरधाव आलेल्या ट्रकने (आरजे 09 जीबी 5303) टेम्पोला जोरदार धडक दिली.
अपघाताच्या आवाजाने दादाभाऊ भालेराव, सोमनाथ भालेराव, साईनाथ भालेराव,सुनील भालेराव आणि इतर ग्रामस्थांनी मदत करून टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेले जगन्नाथ आहेरकर आणि राजकुमार आहेरकर यांना बाहेर काढले. ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला बोलवून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच टेम्पोचालक राजकुमार आहेरकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. जगन्नाथ आहेरकर यांच्या पायाला आणि मानेला गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघातात टेम्पोचे बरेच नुकसान झाले असून गाडीतील असणारे पेपर रोल पुणे-नाशिक महामार्गावर अस्ताव्यस्त पडले होते.
अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, त्याच्या विरोधात मंचर पोलिसांनी वाहन निष्काळजीपणे चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जगन्नाथ आहेरकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश डावखर पुढील तपास करत आहेत.