अहमदाबाद: देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. देशात तिसऱ्या आघाडीचे वारे वाहताना दिसत आहे. मात्र अशी चर्चा सुरु असतानाच तिकडे आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या होमग्राउंड अर्थात गुजरातमध्ये स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला आम आदमी पक्षाकडून मोठेआव्हान देण्यात आले आहे. गुजरातमध्ये सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याची घोषणा आपचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल सध्या अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
Aam Aadmi Party (AAP) to contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls: AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/3GXvtPVfMt
— ANI (@ANI) June 14, 2021
अहमदाबादमध्ये माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. गढवी शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं उपस्थित करत असतात. पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर केजरीवालांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘२०२२ मध्ये आप गुजरातमधील सर्व जागा लढवेल. आम्ही गुजरातला एक नवं मॉडेल देऊ. गुजरातचं मॉडेल दिल्ली मॉडेलपेक्षा वेगळं असेल. आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. त्यावरच आमचं राजकारण आधारित असेल,’ असे केजरीवाल म्हणाले.
‘२०२२ मध्ये आम्ही स्थानिक जनतेच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवू आणि चेहरादेखील इथलाच असेल,’ अशी महत्त्वाची घोषणा केजरीवाल यांनी केली. ‘भाजप आणि काँग्रेस सरकारांच्या कारस्थानांमुळे आज गुजरातची ही अवस्था आहे.
गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. २७ वर्षांपासून भाजप आणि काँग्रेसची मैत्री आहे. काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. भाजपच्या गरजेनुसार काँग्रेसकडून पुरवठा केला जातो,’ अशा शब्दांत केजरीवालांनी गुजरातमधील काँग्रेस, भाजपच्या राजकारणावर तोंडसुख घेतले.