अहमदाबाद -काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणारे गुजरात राज्य ढवळून काढण्यासाठी आम आदमी पक्ष (आप) सज्ज झाला आहे. त्याचाच भाग म्हणून आपने 2 एप्रिलला अहमदाबादेत रोड शोचे आयोजन केले आहे. त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सहभागी होणार आहेत.
दिल्लीनंतर पंजाबची सत्ता काबीज केल्याने आपचा उत्साह दुणावला आहे. देशभरात विस्तारण्याच्या आपच्या संकल्पाने आता आणखीच उभारी घेतली आहे. अशात चालू वर्षीच्या अखेरीस गुजरातमध्ये निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होमपिच असल्याने गुजरातला राजकीयदृष्ट्या मोठे महत्व आहे.
त्यामुळे आपने मिशन गुजरात हाती घेण्याचे ठरवले आहे. त्या राज्यात कॉंग्रेसला मागे सारून सत्तारूढ भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी बनण्याचा विडा आपने उचलला आहे. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आतापासूनच गुजरातमध्ये मोर्चेबांधणी करण्याची त्या पक्षाची रणनीती आहे. त्यादृष्टीने आपच्या रोड शोचे महत्व वाढले आहे.
पुढील काळात केजरीवाल आणि आपचे प्रमुख नेते गुजरातचे नियमितपणे दौरे करणार असल्याची माहितीही पक्षाकडून देण्यात आली.