वेलिंग्टन – कर्णधार मेग लेनिंगने फटकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळी लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून पराभव केला. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत साखळीतील पाचही सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने आपली अजिंक्य वाटचाल कायम राखताना उपांत्य फेरीही निश्चित केली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 5 गडी गमवून 271 धावा केल्या. विजयासाठी 272 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमवत 46 व्या षटकांत पूर्ण केले. आता दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.
दक्षिण आफ्रिकेला लिझले ली आणि लॉरा वॉलवार्डट या जोडीने 88 धावांची सलामी दिली. ली 36 धावांवर बाद झाली. त्यानंतर लारा गुडाल 15 धावांवर बाद झाली. ली आमि सुनलुस या जोडीने संघाचा डाव सावरला. ली हिने 134 चेंडूत 90 धावा तर लुसने 51 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्या बाद झाल्यावर मरिझना केपने 30 व क्लोइ ट्रायनने 17 धावा केल्या व संघाला अडीचशे धावांचा पल्ला गाठून दिला.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीर रशेल हेन्स (17) आणि अलिसा हिली (5) धावांवर बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार मेग लेनिंगने संघाचा डाव सावरला. तिने सामन्यावर एकहाती नियंत्रण घेत 130 चेंडूत नाबाद 135 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला. बेथ मून (21), तहिला मॅकग्रा (32), एशले गार्डनर (22) आणि अनाबेल सदरलॅंड (नाबाद 22) यांनी उपयुक्त खेळी केली व संघाच्या विजयाला हातभार लावला.
संक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका – 50 षटकांत 5 बाद 271 धावा. (लौरा व्होल्वहार्ट 90, सुन लुस 52, लिझेल ली 36, मरिझना केप 30, क्लोइ ट्रायन 17, अनाबेल सदरलॅंड 1-26, अलाना किंग 1-35). ऑस्ट्रेलिया – 45.2 षटकांत 5 बाद 272 धावा. (तहिला मॅकग्रा 32, एशले गार्डनर 22,मेग लेनिंग नाबाद 135, अनाबेल सदरलॅंड नाबाद 22, शबनिम इस्माईल 2-33, श्लोल ट्रायन 2-44).