नवी दिल्ली – दिल्लीत निर्विवादपणे सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाने पंख फैलावण्यास सुरू केली आहे. राष्ट्रीय राजकारणात अस्तित्व निर्माण करण्यासाठी “आप’ने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी याची आज घोषणा केली.आगामी दोन वर्षात सहा राज्यात विधानसभा निवडणुका होत असून, आप या निवडणूका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील राजकारणात पाय रोवल्यानंतर आम आदमी पार्टीने देशाच्या राजकारणात पाऊल ठेवण्यास सुरू केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन वर्षात सहा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय आपने घेतला असून, मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूक आप लढवणार आहे. त्यामुळे या सहा राज्यांतील निवडणुकीत आणखी रंगत वाढणार आहे.
कार्यकारिणीच्या बैठकीत केजरीवाल म्हणाले, देशातील शेतकरी दुःखी आहे.
मागील 25 वर्षांमध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून जमीन हिरावून घेऊन भांडवलदारांना देण्याची तयारी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार दुर्दैवी आहे असून, शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.