सिडनी : ऑस्ट्रेलियन समुद्र किनारा जैवविविधतेने समृद्ध आहे. आता या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा तब्बल शंभर वर्षातून पाचव्यांदा पायावर चालणाऱ्या एका दुर्मिळ आणि दुर्लभ असा माशाचे दर्शन झाले आहे. गेल्या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त पाच वेळा हा मासा दिसला होता. यापूर्वी या माशाचे दर्शन बावीस वर्षांपूर्वी झाले होते आता पुन्हा एकदा हा पायावर चालणारा मासा पाहायला मिळाला आहे.
हा मासा पिंक हँडफिश म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वैज्ञानिकांना या दुर्लभ आणि दुर्मिळ माशाचे दर्शन झाले आहे. बावीस वर्षांपूर्वी 1999 मध्ये तस्मानीया समुद्रकिनाऱ्यावर या माशाचे यापूर्वी शेवटचे दर्शन झाले होते. या माशाला छोटे-छोटे हात असतात पाण्यात पोहताना या हातांचा वापर केला जातोच पण समुद्रातील वाळूवर चालतानाही या हातांचा वापर हा मासा करतो म्हणून या माशाला चालणारा मासा म्हणून ओळखले जाते.
हा मासा अतिशय लहान म्हणजे फक्त पंधरा सेंटीमीटर लांबीचा असतो त्यामुळे समुद्रात याचा शोध घेणे अतिशय कठीण असते. समुद्रसृष्टितून या मासाचे अस्तित्व संपण्याचा धोका निर्माण होत असतानाच पुन्हा एकदा हा मासा वैज्ञानिकांच्या दृष्टीस पडल्याने वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आनंद पसरला आहे. आ ह्या माशाचे अस्तित्व आणि जीवन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे याबाबत काही विचार आता सुरू झाला आहे.