मंचर -आंबेगाव तालुक्यात भविष्यात करोनाबाधित रुग्णांचे प्रमाणात जास्त आढळले, तर त्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून एक हजार बेडची व्यवस्था मंचर-वडगांव-काशिंबेग येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि एखादे खासगी हॉस्पिटल घेऊन केली जाणार आहे.
स्थानिक आरोग्य सेवक, तसेच डॉक्टरांची कमतरता निर्माण होणार आहे, त्यामुळे मंचर शहर व तालुक्यातील खासगी डॉक्टरांशी बोलून जे डॉक्टर या कामासाठी सेवा द्यायला तयार आहेत, त्यांना मंचर येथील सरकारी रुग्णालयात, तसेच घोडेगाव येथील सरकारी रुग्णालयात आणि नवीन उभारण्यात येणाऱ्या सेंटरमध्ये काम करता येईल. एखादे खासगी हॉस्पिटल उपलब्ध होते का, तेही पाहता येणार आहे, अशी माहिती कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात करोनाचे रुग्ण आणि भविष्यात जर रुग्ण वाढले तर रुग्णांचे नियोजन करण्यासाठी मंचर-अवसरी फाटा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते.
बैठकीस जिल्हा धिकारी नवलकिशोर राम, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक निरीक्षक प्रदीप पवार, डॉ. सचिन गाडे, डॉ. हर्षद शेटे, डॉ. सुनील खिंवसरा, डॉ. नरेंद्र लोहकरे, डॉ. विनायक खेडकर, डॉ. लीना गुजराथी, डॉ. महेश गुडे, डॉ. संजयकुमार भवारी उपस्थित होते.
करोनाबाधितांची संख्या वाढत गेल्यास आवश्यक उपाययोजनांचे संपूर्ण नियोजन बैठकीत करण्यात आले. पुण्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने तालुक्यातील रुग्णांवर तालुक्यातच उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि नागरिकांना चांगली उपचार पद्धती देणे, हे महत्त्वाचे विषय असून त्यावर नियोजन केले असल्याचे यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे व इतर शहरांमधून येणारे नागरिक करोनाबाधित सापडत होते. मात्र, आता स्थानिक नागरिक करोना पॉझिटिव्ह मिळू लागले आहेत. यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे.
-नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी पुणे