नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना तात्पुरते जीवदान

 

काठमांडु – नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या भवितव्याबद्दल चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वाची बैठक पुराच्या कारणावरून आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधानांना तात्पुरते जीवदान मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या भारत विरोधी वक्तव्याबद्दल तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली असून त्यावर या बैठकीत चर्चा होणार होती.

सरकारच्या प्रवक्‍त्याने सांगितले की नेपाळमध्ये अनेक ठिकाणी सध्या पूर परिस्थिती ओढवली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सरकार सध्या तेथील मदत कार्यात गुंतले असल्याने राजकीय विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध ठिकाणच्या दरडी कोसळण्याच्या घटनेत किमान 12 जण ठार झाले आहेत. पंतप्रधानांच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची बैठक रद्द करण्यात आल्याचा हा चौथा प्रकार आहे.

तेथील सत्तारूढ पक्षात दोन गट कार्यरत असून ओलींच्या विरोधातील गटाचे नेतृत्व प्रचंड हे करीत आहेत. पंतप्रधान ओली यांची खुर्ची कायम राहावी यासाठी चीन प्रयत्नशील आहे. चीनचे नेपाळमधील राजदूत होऊ यॉंकी हे यासाठी चीनच्या राजकारणात सतत हस्तक्षेप करीत असल्याचे सध्या दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.