पिंपरी – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनीत लहान मुलांच्या किलबिलाटाने बालनगरी गजबजणार असून या संमेलनात बोक्या सांतबंडे, ग्रीप्स नाटक, बालगीते, पपेट शो आदींचा समावेश आहे. क्लाऊन माइम अॅक्ट हा प्रकार पिंपरी – चिंचवडमध्ये प्रथमच सादर होणार आहे. नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी बालनगरीच्या उभारणीसाठी विशेष लक्ष दिले आहे.
चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलनावर ६ व ७ जानेवारीदरम्यान शतकी नाट्य संमेलन होत आहे. या संमेलनात प्रथमच लहान मुलांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येसह शुक्रवारी (दि. ५) नाट्य संमेलनाच्या दोन्ही दिवसही या बालनगरीत लहान मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. बालनाट्य नगरीमधील विविध कार्यक्रमांची निवड प्रकाश पारखी, धनंजय सरदेशपांडे, रुपाली काठोळे- पाथरे , मयूरी जेजुरीकर, गौरी लोंढे या समितीने केली आहे. ही बालनगरी भोईर नगर येथील मैदानावर असणार आहे.
पूर्वसंध्येला स्थानिक बाल कलाकारांच्या विविध कार्यक्रमाबरोबरच, सुट्टी गाजवलेले ‘ बोक्या सांतबंडे’ हे व्यावसायिक बालनाट्य, ग्रीप्स थिएटरचे गोष्ट सिंपल पिल्लांची, बालगीते, पपेट शो हे मुलांसाठी आकर्षण असणार आहे. तसेच क्लाऊन माइम अॅक्ट हा प्रकार पिंपरी – चिंचवडमध्ये प्रथमच सादर होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, झोपडपट्टी भागात असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आमं.ित्रत केले आहे, कारण तिकीट काढून असे कार्यक्रम त्यांना अनुभवता येणार नाहीत. तसेच इतरही लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी होतील.
आजपर्यंत लहान मुलांसाठी एखादं, दुसरं नाटक किंवा बाल गीतांचा कार्यक्रम व्हायचा. त्यामुळे नाट्य संमेलनात लहान मुलांचा सहभाग कमी प्रमाणात दिसायचा. परंतु, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेताना आम्ही जाणीवपूर्वक लहान मुलांसाठी ‘बालनगरी’ हा एक वेगळा रंगमंच ठेवला आहे. लहान मुलांना बालपणापासूनच नाटकाची गोडी लागावी, त्यांच्यावर नाटकाचे संस्कार व्हावेत, हा यामागील उद्देश आहे.
– भाऊसाहेब भोईर, आयोजक