चंदीगड – हरियाणातील हिंसाचाराचे लोण आता त्या राज्यातील पानिपत येथे पोहचले आहे. तेथे काही अज्ञात लोकांनी एका दुकानाची तोडफोड केली आणि दोन वाहनांना आगी लावल्या.
नूह येथील जातीय संघर्षात ठार झालेल्या एका व्यक्तीच्या घराजवळ हे दुकान होते. हे चिकन विक्रीचे दुकान होते. दुकानाशेजारी असलेली दोन वाहनेही हल्लेखोरांनी पेटवून दिली.
काही स्थानिक रहिवाशांनी पत्रकारांना सांगितले की या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये सलोखा आणि बंधुभाव आहे पण येथील शांततापूण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत काही बदमाशांनी हे कृत्य केले आहे.
याप्रकारानंतर पानीपत येथे विविध संवेदनशील स्थळी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राममध्ये विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याच्या प्रयत्नानंतर नूहमध्ये उफाळलेल्या चकमकीत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.