प्योंगयोंग – गेल्या दोन महिन्यांपासून उत्तर कोरियामध्ये करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. आता देशात आणखी एका आजारामुळे देशाच थैमान घातले आहे. देशाच्या अनेक भागात हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढल्याचं म्हटले जात आहे. या आजाराने बाधित लोकांच्या संख्येबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. मात्र हा आजार गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टशी संबंधित असल्याचे म्हटले जाते आहे. म्हणजेच हा एक पचनाचा आजार आहे.
उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी बुधवारी पश्चिमेकडील बंदरगाह शहरात हेजू येथील पीडित रुग्णांच्या मदतीसाठी औषधे पाठवली आहेत. किम जोंग उन यांनी ही साथ लवकरात लवकर रोखण्याच्या गरजेवर भर दिला आहे. अशा परिस्थितीत संशयित रुग्णांना तातडीने विलगीकरण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
उत्तर कोरियामध्ये गुरुवारी तापाची लक्षणे असलेल्या आणखी 26,011 लोकांची नोंद झाली. एप्रिलच्या अखेरीपासून, देशभरात तापाच्या रुग्णांची एकूण संख्या 4.56 मिलियन इतकी नोंदली गेली आहे. तर आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्योंगयांग दररोज तापाच्या रुग्णांची संख्या जाहीर करत आहे. येथे करोना चाचणी किटचा मोठा तुटवडा आहे. करोनाची लाट कमी होते आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने या महिन्याच्या सुरुवातीला प्योंगयांगच्या दाव्यांवर संशय व्यक्त केला आणि तेथे परिस्थिती आणखीनच बिकट होत असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यातच उत्तर कोरियामध्ये करोनामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. देशात आधीच करोनाशी लढण्यासाठी औषध आणि लसींचा मोठा तुटवडा आहे.