सेऊल – सुपर-लार्ज क्रूझ क्षेपणास्त्र वाॅरहेड आणि नवीन विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केली असल्याचे उत्तर कोरियाने शनिवारी सांगितले. पश्चिम किनारपट्टी भागात ही चाचणी घेण्यात आली. अमेरिका आणि दक्षिण कोरियाबरोबरचा लष्करी तणाव वाढू लागल्यामुळे या चाचण्या घेण्यात आल्याचे उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी म्ह्टले आहे. (North Korea Tests the Resilience of Strategic Cruise Missiles and Anti-Aircraft Missiles)
शुक्रवारी वासल-१ रा-३ या क्रूझ क्षेपणास्त्रासाठी तयार केलेल्या वॉरहेडची पॉवर चाचणी आणि पायलज्जी-१-२ या विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली, असे उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे, दोन क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली जात असतानाचे फोटो देखील या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत.
उत्तर कोरियाने २ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारच्या चाचण्या केल्या होत्या. परंतु त्यावेळी क्रूझ क्षेपणास्त्राची किंवा विमानविरोधी क्षेपणास्त्राची नावे नमूद केली नव्हती. गेले काही आठवडे त्याच प्रणालीची चाचणी घेतल्यानंतर या प्रणालीच्या तांत्रिक प्रगतीचा आढावा घेतला जात असावा, असा अंदाज आहे. शुक्रवारच्या चाचण्या उत्तर कोरियाच्या नियमित लष्करी विकास कार्यक्रमाच्या एक भाग होत्या आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी त्यांचा काहीही संबंध नव्हता, असे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
उत्तर कोरियाकडून थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित केल्यापासून कोरियाच्या द्विपसमुहामध्ये तणाव निर्माण झाला आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला धमकावण्यासाठी उत्तर कोरियाकडून सातत्याने या चाचण्या घेतल्या जात असतात.
या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी उत्तर कोरियाला रशियाकडून तंत्रज्ञान मिळाले असल्याने त्यात वेगाने प्रगती होत आहे, असे निरीक्षकांनी म्हटले आहे. तसेच चीनच्या आधुनिक प्रणालीच्या आधारे उत्तर कोरिया स्वतःची प्रणाली विकसित करत असल्याचाही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा संशय आहे. युक्रेनमधील युद्धाची व्याप्ती वाढवण्यासाठी उत्तर कोरियाने रशियाला दारुगोळा आणि इतर उपकरणे पुरवल्याचा आरोप अमेरिका आणि दक्षिण कोरियाने केला आहे.