अभिनेत्री श्रुती हसन ही काजोलसोबतच्या “देवी’ नामक एका 13 मिनिटांच्या बहुचर्चित शॉर्ट फिल्ममध्ये झळकली. या शॉर्टफिल्ममधील तिच्या अभिनयाची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. ही शॉर्ट फिल्म आतापर्यंत एक कोटी लोकांनी पाहिली आहे. दुसरीकडे मे महिन्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या तिच्या “क्रेक’ या चित्रपटाचीही सध्या चर्चा आहे. या चित्रपटात दक्षिणेतला सुपरस्टार रवी तेजा तिच्यासोबत झळकणार आहे. यामध्ये श्रुती एक सशक्त व्यक्तिरेखा साकारणार आहे.
असं असलं तरी हिंदी चित्रपटसृष्टीत मात्र श्रुतीला आपले वडील कमल हसन यांच्याप्रमाणेच काहीसं मन मारुन राहावं लागत आहे. गब्बर, वेलकम यांसारख्या लागोपाठ हिट चित्रपटांनंतर तिला फारशा चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्याच नाहीत. खुद्द श्रुतीलाही ही गोष्ट मान्य आहे. ती म्हणते, या दोन चित्रपटांनंतर आलेले माझे काही चित्रपट प्रेक्षकांना पसंत पडले नाहीत. दुसरीकडे मी दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये खूप व्यस्त असते.
कमल हसन यांच्याप्रमाणेचच श्रुतीची ओळख केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही. मॉडेलिंग, गायन, म्युझिक कंपोझिंग, डान्सिंग यांविषयीही श्रुतीला बरीच माहिती आहे. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन तसेच नृत्यदिग्दर्शनही केले आहे. पण हिंदी चित्रपटांत तिला केवळ अभिनयापुरतेच मर्यादित ठेवण्यात आले.
इथे तिच्या गायनालाही वाव दिला गेला नाही. पण दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती सातत्याने पार्श्वगायन करताना दिसत आहे. “देवी’मध्ये काम करण्यामागे हेही एक कारण असल्याचे श्रुती सांगते. सध्या ती “लाबाम’ या तामिळी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. यानंतर एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण ती करणार आहे. हा चित्रपट दक्षिणेकडील एक मोठा दिग्दर्शक दिग्दर्शित करणार आहे. ही माझी नवी सुरुवात असेल, असे ती सांगते.