पुणे – मणिपुर येथे महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना ताजी असून, यामुळे संपूर्ण देशात खळबळ असता पुणे शहरात कामाच्या शोधात आलेल्या मणिपुर येथील अल्पवयीन मुलीचा (16 वर्षे) विनयभंग झाल्याचे उघड झाले आहे. कोंढवा भागात घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी अल्ताफ नाझीर खान (वय 21, रा. मालविल मशिदीजवळ, कोंढवा खुर्द) याला अटक केली आहे.
तरूणीने स्वत: याबाबत कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी एक महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आली होती. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या तीन बहिणी भाडेतत्वावर खोली घेऊन कोंढवा भागातील एका इमारतीत राहायला आहेत. मुलगी रात्री इमारतीच्या जिन्यातून निघाली होती. त्यावेळी आरोपी खानने तिला धक्का मारला आणि मुलीचा तोल गेला.
त्यावेळी खानने अल्पवयीन मुलीला सावरण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी अश्लील कृत्य केले. मुलीने आरडाओरडा केला. तेव्हा तिची बहीण खोलीतून बाहेर आली. खान तेथून पसार झाला. पसार झालेल्या खानला पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.