पुणे – वारंवार भांडण करून त्रास देत असल्याच्या कारणावरून डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर डोक्यात दगड घालून चुलत भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा मोक्काचे विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी सुनावली.
विकास बबन खेडकर (रा. खंडाळे, ता. शिरूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. प्रकाश मच्छिंद्रनाथ खांडेकर याच्या खूनप्रकरणी वडिलांनी रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले.
घटनेच्या पूर्वी दोन वर्षांपासून मयत प्रकाश आणि पत्नीचे भांडण झाले होते. तर, या प्रकरणात विकास आणि प्रकाश यांच्यात वाद झाले होते. यामुळे विकासने प्रकाशचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विकास याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. पताळे यांनी केली.