नवी दिल्ली : आजपासून सुरु होणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या दरांत कपात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी सिलिंडर स्वस्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. दिल्लीत इंडेनच्या १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपये ५ पैशांची कपात करण्यात आली आहे. तर कोलकात्यात ११३, मुंबईत ११५ रुपये ५ पैसे आणि चेन्नईमध्ये ११६ रुपये ५ पैशांनी हे दर कमी करण्यात आले आहेत.
१ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. दरम्यान घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवे दर लागू झाल्यानंतर दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी १७४४, कोलकात्यात १८४६, मुंबईत १६९६ आणि चेन्नईत १८९३ रुपये मोजावे लागणार आहेत.
एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एपलीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात होत असताना घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणतेही बदल होताना दिसत नाहीत. ६ जुलैपासून घऱगुती सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर 14.2 किलोचा सिलेंडर कोलकात्यात 1079 रुपये, चेन्नईमध्ये 1068.5 आणि मुंबईत 1052 रुपयांना उपलब्ध आहे. भारतातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात.
देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत निश्चित करतात. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.