2025 पर्यंत मधुमेह रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा धोका
वॉशिंग्टन : जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ञांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट जास्त साखरेचे सेवन भारतीय करत असून 2025 पर्यंत भारतामध्ये मधुमेही रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढण्याचा धोका आहे. जागतिक आरोग्य संघटने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली असून गोड खाण्याचे शौकीन असलेल्या भारतीयांनी साखरेच्या सेवनावर मर्यादा ठेवाव्यात असा इशाराही देण्यात आला आहे.
जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ञांनी ठरवून दिलेल्या मर्यादाप्रमाणे व्यक्तीने दिवसात जास्तीत जास्त सहा चमचे साखर सेवन करावी असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात भारतीयांचे साखरेचे सेवनाचे प्रमाण दररोज 12 चमचेपेक्षा जास्त आहे. भारतीयांचे साखरेचे सेवन करण्याचे प्रमाण असेच कायम राहिले किंवा त्यात वाढ झाली तर भारत एक दिवस मधुमेही रुग्णांची राजधानी म्हणून ओळखली जाईल असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
प्रत्यक्ष साखर खाण्यापेक्षाही अप्रत्यक्ष पद्धतीने मोठ्या प्रमाणावर साखरेचे सेवन केले जाते पॅकेज फूड प्रॉडक्ट असो किंवा इतर गोड पदार्थ असोत त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर साखर पोटात जाते 2015 च्या आकडेवारीप्रमाणे भारतात तेव्हा सात कोटी वीस लाख मधुमेही रुग्ण होते.
2025 पर्यंत ही संख्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 14 कोटी पर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. अनेक वेळा मधुमेह रुग्णांची ओळखच पटत नसल्याने ही संख्या अधिक जास्त असू शकते. भारतीयांनी आगामी कालावधीमध्ये काळजीपूर्वक साखरेचे सेवन करावे आणि अप्रत्यक्षपणे पोटात जाणाऱ्या साखरेवर नियंत्रण ठेवावे असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य तज्ञांनी दिला आहे.