जीव कासावीस करणारी घटना ! भंडाऱ्यातील अग्नितांडवात दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

शॉर्ट सर्किटमुळे नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग;सात बालकांना वाचवण्यात यश

भंडारा : राज्यात आजची सकाळ ही सर्वांसाठी मन कासावीस करणाऱ्या घटनेने झाली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे नवजात चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आले. नर्सने दार उघडून बघितले असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

या दूर्दैवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरडाओरडा सुरू झाला. मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठकही झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.