भर उन्हातसुमारे लाखभर भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन
राजगुरुनगर – श्रीक्षेत्र निमगाव येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त सदानंदाचा येळकोट, येळकोट करीत भंडार खोबर्याची उधळण करीत सुमारे एक लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. उन्हाचा तडाखा असला तरी भाविकांचा उत्साह दिसून येत होता.
खेड तालुक्यात देवतोरणे, कडधे, खरपुडी, निमगाव येथे खंडोबा देवाची ठाणी आहेत. चैत्र पौर्णिमा निमित्त देवाची यात्रा भरते. सर्वाधिक गर्दी निमगाव आणि कडधे येथे होते राज्यभरातील कुलदैवत असलेले भाविक भक्त येथे दर्शनासाठी दरवर्षी येतात. यावर्षी गेले 15 दिवसांपासून उन्हाचा तडाखा असल्यामुळे भाविकांची गर्दी कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दिवसभर भाविकांचा यात्रेतील उत्साह अधिक होता.
प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे खरपुडी खंडोबा येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्यामध्ये जुना वाद असल्यामुळे तसेच धर्मदाय आयुक्तानी ट्रस्टी व ग्रामस्थांना भाविकांकडून देणगी स्वीकारण्यास मनाई आदेश दिला असल्याने दोन वर्षे देणगी मिळत नसल्याने भाविकांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. तसेच मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय होताना पाहायला मिळाली.
चैत्र पौर्णिमीएनिमिताने निमगाव व खरपुडीसह कडधे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. उत्तर पुणे जिल्हा, ठाणे, मुंबई, संगमनेर, अहमदनगर येथून भाविक आले होते.खंडोबा मंदिर परिसरात कुलधर्म कुलाचार करता भाविक देवाची तळी भंडार भरुन दर्शन घेत होते. देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष बबनराव शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, संतोष शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, मोहन शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, विजयसिंह शिंदे, संभाजी राऊत, नवनाथ तांबे, दत्ता दाभाडे ग्रामस्थांनी परिश्रम घेतल्याने यात्रा सुरळीत झाली.पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
नवसाचे बैलगाडे पळविले
देवाचे नवसांचे बैलगाडे घाटात पळविण्यात आले. मंदिर मार्गावर व परिसरात खोबरे, भंडारा फुलांचे हार, देववस्त्र, खेळणी, थंडपेय, कलिंगड, शेव रेवडी इत्यादी दु्काने थाटली होती. मंदिर परिसरात भविकांनी जागरण गोंधळ घातला दिवसभरात 100 अधिक जागरण गोंधळ झाले.