पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 24 तासांत पुन्हा 152 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एक रुग्ण शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा 97 हजार 623 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (शुक्रवारी) महापालिकेला प्राप्त झाला. त्यानुसार शहरातील 151 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील एकाचा करोना अहवाल सकारात्मक आला आहे.
तर गेल्या 24 तासांत एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मयत महिला ही शहरातील जाधववाडी येथील रहिवाशी होती. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1768 वर पोहोचला असून शहराबाहेरील 735 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा 2503 झाला आहे.
आतापर्यंत शहरातील 94 हजार 158 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 7448 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2307 संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.