सिडनी – ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी कसोटी सामन्यासाठी क्लेरी पोलोसॅक या पंच म्हणून काम पाहात आहेत. पुरुषांच्या कसोटी सामन्यासाठी काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला पंच ठरल्या.
न्यू साऊथ वेल्सच्या 32 वर्षीय पोलोसॅक या अनुभवी पंच असून. त्यांनी यापूर्वी आयसीसीच्या द्वितीय श्रेणीच्या नामिबिया विरुद्ध ओमान या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात मैदानावरील पंच म्हणून काम पाहिले आहे. सिडनी कसोटीसाठी त्या चौथ्या पंच म्हणून काम करत आहेत.
पॉल रायफल आणि पॉल विल्सन हे दोन माजी वेगवान गोलंदाज हे मैदानावरील पंच आहेत.तर, टी. व्ही. पंच म्हणून ब्रुस ऑक्सेनफोर्ड काम पाहात आहेत. माजी कसोटीपटू डेव्हिड बून हे सामना निरीक्षक आहेत. आयसीसीच्या नियमानुसार चौथा पंच नियुक्त करण्याची जबाबदारी ही स्थानिक क्रिकेट मंडळाची असते. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पंच समितीमधील पंच असावा अशी अट असते. पोलोसॅक या ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणीच्या पुरुषांच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणाऱ्या देखील पहिल्या महिला पंच ठरल्या आहेत.
नवा चेंडू घेऊन जाणे, ड्रींक्सब्रेकमध्ये मैदानावरील पंचांना पाणी घेऊन जाणे, लाईट मीटरच्या बॅटरी चेक करणे, उपहार आणि चहापानाच्या वेळेत खेळपट्टीची पाहणी करणे, नव्या बेल्स आणणे ही चौथ्या पंचांची सामन्या दरम्यानची जबाबदारी असते.