मुंबई – प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत देसाई यांनी आपलं आयुष्य संपवलं. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी देसाई यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अशात त्यांच्या आत्महत्येबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
एन डी स्टुडीओमधील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या मालिकेच्या सेटवर देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली.यावेळी देसाई यांनी एक चिठ्ठी लिहीत त्यात आपल्या अंतिम विधीबाबतची इच्छा देखील व्यक्त केली असल्याचे एन डी स्टुडीमधील एका कर्मचाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
देसाई यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांचा अंत्यविधी त्याच ठिकाणी करण्यात यावा अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार सहा नंबरच्या ग्राउंडवर त्यांचा अंत्यविधी होणार असल्याचे तेथील कर्मचाऱ्याने वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.
ऑडिओ क्लिपमध्ये उद्योगपतींची नावे?
देसाईंनी गळफास घेतला त्या जागी पोलिसांना एक व्हॉईस रेकॉर्डर सापडल्याची माहिती आहे. तसेच त्यात सुसाइड करण्यापूर्वी त्यांनी काही व्हॉइस क्लीप रेकॉर्ड करत त्यात 4 उद्योगपतींची नावे घेतल्याचा दावा केला जात आहे. देसाई यांनी मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला आले. त्यानंतर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ते एनडी स्टुडिओत पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावले. तुला उद्या सकाळी मी व्हॉइस रेकॉर्डर देतो, असे ते त्यांना म्हणाले. त्यांच्या सूचनेनुसार मॅनेजरने बुधवारी रेकॉर्डर घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी मेगाहॉलजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. त्यावेळी हा व्हॉइस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच पडला होता. पोलिसांनी तो जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.