मुंबई – मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कलाविष्काराने सगळ्यांची मने जिंकणारे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांचा डोळा होता, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे असा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.
हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
नितेश राणे म्हणाले, एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या मातोश्रीशी निगडीत माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या. नितीन देसाईंवर जोरजबरदस्ती करत त्यांच्यावर दबाव आणल्या जात होता.
आम्हाला कोणाच्या मृत्यूवर राजकारण करायचे नाही. मात्र, एनडी स्टुडीओ घेण्यासाठी नितीन देसाईंचा मानसिक छळ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी केला. ठाकरे सिनेमाचे काही शुटींग एनडी स्टुडिओमध्ये केले होते.
त्याचे पैसे दिले होते का? अजूनपर्यंत त्या शुटींगचा चेक दिला होता का याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यायला हवे, असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला.