मुंबई – चार वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते नितीन चंद्रकांत देसाई यांचे अकाली निधन हे हिंदी चित्रपटसृष्टीची अवस्था आणि दुर्दशा या दोन्हींचे अत्यंत दु:खद संकेत आहे. शो ऑफच्या जीवनात मग्न असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील तमाम चित्रपट निर्माते आणि त्यांच्या कंपन्यांचे हे कटू सत्य आहे आणि हेही खरे आहे की, नितीन देसाई हे अनेक आठवडे कर्जबाजारी झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. त्यांचा स्वत:चा जीव घेण्याचा निर्णयही याचाच परिणाम असल्याचे मानले जात आहे.
नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईस कंपनीच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबत रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर भांदवी कलम 306 अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
आणि त्या अंतर्गत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अश्यातच देसाई यांची कन्या ‘मानसी देसाई’ यांनी या प्रकरणाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “चुकीची माहिती पसरवू नका. लवकरच खरं काय ते बाहेर येईल..’ असं मानसी देसाई यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना मानसी म्हणाल्या की, ‘मी मानसी नितीन देसाई. ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची मोठी मुलगी. मी माझ्या आई आणि परिवारातून हे स्टेटमेंट देत आहे. माझे बाबा नितीन चंद्रकांत देसाई 2 ऑगस्ट 2023 ला सोडून गेले.
त्यानंतर मीडियामध्ये खूप गोष्टी आणि चुकीची माहिती पसरली आहे. हे स्टेटमेंट देण्याचा हाच हेतू आहे की, ही दुखद घटना घडल्यानंतर मीडियाने त्यांच्याबद्दल लोन डिफार्मेंट आणि चुकीच्या गोष्टी पसरवायला सुरु केली.
आम्ही त्यांची बाजू आणि त्यांच्यासोबत जे खरं घडलं तेच समजवायचा प्रयत्न करतोय. लोन 181 कोटींचं होतं. आम्ही फेब्रुवारी 2020 पर्यंत 86.31 कोटी रुपये परतफेड केले होते. त्यानंतर करोना संकट आल्यामुळे पूर्ण दुनिया थांबली. बॉलिवूडलाही त्याचा खूप धक्का बसला.
बाबांकडे कामं नव्हती म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला. त्यामुळे हप्ते भरायला उशिर झाला. नियमितपणे हफ्ते भरता आले नाहीत. मात्र पैसे बुडवण्याचा कोणताही हेतू नव्हता. वन टाईम सेटलमेंटसाठी कंपनीकडून टाळाटाळ करण्यात आली, एडलवाईज कंपनीने वडिलांना खोटी आशा दाखवली.’ असं मानसी देसाई यांनी म्हटलं आहे.