मुंबई – थकित कर्जाबद्दल बॅंक ऑफ बडोदाने अभिनेता व भाजपचा खासदार सनी देओल याच्या जुहु येथील बंगल्याचा लिलाव पुकारला होता. परंतु तो लगेचच मागे घेण्यात आला आहे. लिलावीची ही नोटीस बॅंकेने तडकाफडकी मागे घेतल्याने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. डिसेंबर 2022 पासून बॅंकेचे 55.99 कोटी रुपयांचे कर्ज आणि व्याज तसेच दंड थकित होते.
त्यामुळे “सनी व्हिला’ हा बंगला बॅंकेने जप्त केला. आणि त्याच्या ई-लिलावासाठी 51.43 कोटी रुपयांची राखीव किंमत आणि 5.14 कोटी रुपयांची बयाणा ठेव निश्चित केली. मात्र, 24 तासांपेक्षा कमी कालावधीत बँकेने ही नोटीस मागे घेतली. बॅंक ऑफ बडोदाने ‘तांत्रिक कारणांमुळे’ लिलावाची नोटीस मागे घेतली. असं यावेळी सांगण्यात आलं होत.
दरम्यान, यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “सनी देओल यांना वाचवलं मात्र नितीन देसाई यांना वाचवण्यात आलं नाही, त्यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं…’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप सरकरावर निशाणा साधला आहे. यावेळी राऊत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, “अभिनेते सनी देओल यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बरोडा करणार होती. जवळपास 60 कोटी रुपयांचं कर्ज सनी देओल फेडू शकले नाहीत. यासाठी बँकेने लिलावाची घोषणा केली. लोकांना बोलावलं. आमचं सनी देओल यांच्यासोबत काही वैर नाही. ते एक उत्तम अभिनेते आणि व्यक्ती आहे, पण 24 तासात लिलाव थांबवण्यात आला.
दिल्लीतून संदेश आला आणि सनी देओल यांचं घर वाचवण्यात आलं. पण आमच्या नितीन देसाई यांना वाचवण्यात आलं नाही. स्वतःचा स्टुडिओ वाचवण्यासाठी देसाई प्रयत्न करत होते. त्यांना देखील कर्ज फेडायचं होतं… त्यांच्याबाबत असा निर्णय घेण्यात आला नाही. त्यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं… हेच सध्या देशात सुरु आहे.’ अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.