सातारा – न्यायालयाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी वकील विलास बाळकृष्ण कुलकर्णी याला जिल्हा न्यायालयात सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले. ऍड. कुलकर्णी याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील एक लाख रुपये त्याने स्वीकारले. खासगी वकिलावर साताऱ्यात झालेली ही आतापर्यंतची पहिलीच मोठी कारवाई आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने जिल्हा न्यायालयात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे स्वातंत्र्यसंग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. एका दाव्यात संस्थेच्यावतीने सातारा येथील दिवाणी न्यायालयात प्रोबेट अर्ज (क्र. 16/2020) दाखल आहे. लोकसेवकावर प्रभाव पाडून या अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्याची हमी खाजगी वकील विलास कुलकर्णी याने दिली होती. त्यासाठी त्याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातारा येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात सोमवारी सापळा रचला.
त्यावेळी मागणी केलेल्या दोन लाख रुपयांच्या रकमेपैकी एक लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना कुलकर्णी याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश येवले, तुषार भोसले, शीतल सपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.