तिकीट तपासणीसांचा ‘श्रमिकांना’ मदतीचा हात

पुणे – लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध भागांमध्ये अडकलेले कामगार, विद्यार्थी आदींना मूळगावी जाण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येतात. मध्य रेल्वेकडून 29 मेपर्यंत सुमारे
574 श्रमिक विशेष गाड्यांतून 7 लाखांहून अधिक नागरिक गावी परतले. गाड्यांच्या सुरळीत संचलनासाठी रेल्वेच्या वाणिज्य, सुरक्षा, तांत्रिक आदी विभागांसह तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांतर्गत सुमारे 2 हजार 9 कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणीसांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.त्यामधील 14 महिला कर्मचाऱ्यांपैकी 10 महिला कर्मचारी पुणे विभागातील होत्या. सामाजिक अंतर राखत गाडीमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना मदत करणे, श्रमिक विशेष गाडीतील डब्यांमध्ये अन्न आणि पाण्याचे वितरण करणे आदींसाठी कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले.

कर्मचाऱ्यांची अशीही मदत
पुणे-लखनऊ श्रमिक विशेष गाडीतून प्रवास करण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक महिला तिच्या मुलाबरोबर रांगेत वॉकरच्या मदतीने चालत होत्या. त्या महिलेची चालताना होत असणारी अडचण लक्षात घेऊन, तातडीने कर्मचाऱ्यांनी महिलेला व्हील चेअरच्या माध्यमातून आसनापर्यंत सोडले.

पुणे स्थानकात दोन लहान मुलांना घेऊन गाडीमध्ये जाण्यासाठी धडपडणाऱ्या महिलेच्या मदतीला कर्मचारी धावून आले. एका कर्मचाऱ्याने त्या मुलाला घेऊन बोगीपर्यंत पोहोचवले. सूरत ते बेहरामपूर धावणाऱ्या गाडीतील महिलेला प्रसूती वेदना होत असल्याची माहिती तिच्या पतीने तेथील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तातडीने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक सुनील कुमार, उप स्थानिक अधीक्षकांच्या (वाणिज्य) मदतीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. संबंधित महिलेची सुखरुप प्रसूती झाल्याने प्रवाशांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.