वीरमध्ये एकाचा अहवाल निगेटिव्ह

गावात फटाके वाजवून औक्षण करीत स्वागत

परिंचे -श्रीक्षेत्र वीर येथे करोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवार (दि. 30) संध्याकाळी नोबेल रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले. ग्रामस्थांनी गावात फटाक्‍याची आतषबाजी, फुलांची उधळत करीत स्वागत केले. नाथ म्हस्कोबांचा गजर करीत औक्षण करण्यात आले.

वीर येथील संशयित रुग्ण हे नव्यानेच मुंबई पोलीस दलात भरती झाले आहेत. जमदाडे हे एक महिन्यांपूर्वी वीर येथे सुट्टीसाठी आले होते. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना तातडीने मुंबई येथे बोलवण्यात आले. कलीना कॉलनीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ते भीतीने (दि.16) वीर येथे आले. दोन दिवसांनी जमदाडे यांना त्रास होऊ लागला.

परिचारिका असलेल्या त्यांच्या पत्नीला संशय आल्याने (दि.19) त्यांची खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पॉझिटिव्ह रुग्ण व पत्नीला पुण्यातील खासगी रुग्णालयात पाठविले होते. कोवीड सेंटरमध्ये असलेल्या पत्नीसह आठजणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यांच्यावर दहा दिवस खासगी रुग्णालयात इतर आजारांवर उपचार करण्यात आले. दहा दिवसांनंतर जमदाडे यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.