पुणे – पोलीस असल्याच्या बतावणीने दोघा जणांनी मिळून येमेन देशातील नागरिकाला लुटल्याची घटना बंडगार्डन परिसरातील हॉटेल ब्लू नाईल ते किराड चौकादरम्यान रस्त्यावर घडली. आरोपींनी तपासणीच्या बहाण्याने परदेशी नागरिकाकडील २ हजार ५०० डॉलर्स लांबविल्याचे उघड झाले असून याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत येमेन देशातील ५३ वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि.२४) सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानूसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे येमेन देशातील नागरिक असून उपचारासाठी ते पुण्यात आले होते. बुधवारी त्यांची पत्नी व मुलीसह बंडगार्डन भागातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यानंतर हॉटेल ब्लू नाईल ते किराड चौकादरम्यान ते रस्त्यावरून पायी जात असताना कारमधून दोघेजण त्यांच्याजवळ आले.
आपण पोलीस असल्याची बतावणी करत बनावट ओळखपत्र देखील दाखविले. त्यानंतर फिर्यादीची पत्नी व मुलीची पर्स चेक करण्याचा बहाणा करून २ हजार ५०० डॉलर्स लांबविले. या डॉलर्सचे मूल्य जवळपास दोन लाख ६ हजार एवढे आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन पवार करत आहेत.