पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- परदेशी नागरिकाला अडवून पोलीस असल्याचे सांगत ४ लाख ७९ हजार रुपये लुटल्याचा आणखी एक प्रकार घडला आहे. हा नागरिक कॅन्सरच्या उपचारासाठी येमेनवरुन पुण्यात आला होता. दरम्यान, अशा प्रकारे परदेशी नागरिकांना लुटण्याची वर्षभरातील ही तिसरी घटना ठरली आहे.
याप्रकरणी सालेह ओथमान एहमद (५२, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारमधून आलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोंढव्यातील आशीर्वाद चौकात घडली.
फिर्यादी सालेह एहमद हे पत्नीसोबत पायी जात असताना आरोपींनी त्यांना अडवत वस्तू, ओळखपत्राची पडताळणी करायची असल्याचे सांगितले. सालेह हे कागदपत्रे, पैसे दाखवत असतांना आरोपीने काही समजायच्या आत कार घेऊन पळ काढला. आरोपी चोरट्याने फिर्यादीचे १ लाख ७७ हजार १२० रुपयांचे सौदी रियाल चलन, २ लाख ४९ हजारांचे अमेरिकन चलन आणि ५३ हजारांचे भारतीय चलन नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करत आहेत.
… आरोपीही बोलतात अरेबिक भाषा
मागील काही घटना लक्षात घेता आरोपी अरेबीक भाषा बोलत असल्याचे लक्षात आले आहे. ते विशेषत: कोंढवा, हडपसर परिसरात रुग्णालयात उपचारासाठी आलेले परदेशी नागरिक हे चोरटे हेरतात. हे नागरिक जेवण केल्यावर जेव्हा हॉटेलमधून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना गाठले जाते. त्यांच्याकडे कागदपत्रांची तपासणी करण्याचा बहाणा करुन लुटले जाते.