नवी दिल्ली – नवरा बायकोच्या भांडणामुळे म्युनिकहून बँकॉकला जाणारे लुफ्थान्साचे विमान बुधवारी दिल्लीकडे वळवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, विमानातील दोन प्रवाशांमध्ये कमालीचे भांडण झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर विमानाच्या कॅप्टनने दक्षतेचा उपाय म्हणून हे विमान दिल्लीत उतरवण्याचा निर्णय घेतला. या पती-पत्नीमधील भांडणाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या फ्लाइट चालकाने सुरुवातीला पाकिस्तानच्या जवळपास विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली, परंतु अज्ञात कारणांमुळे, ती विनंती पूर्ण झाली नाही.
परिणामी, उड्डाण दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. तेथे या भांडखोर दाम्पत्याला विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले. दिल्ली पोलिस किंवा विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेकडून या विषयीचा तपशील अद्याप मिळाला नाही. त्यामुळे हे जोडपे नेमके कोठले आहे, त्याचे नाव काय आहे ही माहिती अद्याप मिळाली नाही.