राहुरी -राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराची नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक बी. जी. शेखर दाखल घेतली असून रविवारी राहुरीत त्यांनी घटनास्थळी समक्ष भेट दिली. या गुन्ह्यातील आरोपींना कडक शिक्षा होईल, अशी ग्वाही देवून कट्टा व बुलेट बनविण्याची हत्यारे साहित्य आरोपीकडून जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, पोलीस उपाधिक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व नानासाहेब सूर्यवंशी होते. पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी सांगितले की, राहुरी येथे नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर जो गोळीबार करण्यात आला. त्याबाबत पोलिसांनी 307 व फायर करुन जखमी करण्याचा प्रयत्न केला म्हणून अंकुश नामदेव पवार याच्यासह इतर आरोपींना अटक केली आहे. आरोपीने या गुन्ह्यात जो कट्टा वापरला तो कट्टा त्याने स्वतः यूट्युबवर पाहून बनविला आहे. तो त्याने कसा तयार केला, याची सविस्तर माहिती घेतली.
तो स्वतःच घरी कट्टा तयार करीत असल्याचे समजले. त्याने हा कट्टा भांडणात वापरला आहे. त्याचे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर राहुरी पोलीस व नगर पोलीस कडक कारवाई करणार आहे. तो गावठी कट्ट्यांबरोबर गोळ्या ही बनवित होता. दोन्ही बनविण्याची हत्यारे व साहित्य पोलिसांनी जप्त केली आहे.
राहुरी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्लॉट जागा जमीन बळकविण्याचे तसेच खरेदी-विक्री ज्यांना धमकी देणे, दमबाजी करणे, असे प्रकार घडले असतील तर त्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. त्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे आवाहन शेखर यांनी केले. या घटनेतील आरोपी अंकुश नामदेव पवार याच्यावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. राहुरी तालुक्यातील अशा गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.