समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – “नागवडे’ कारखान्याची निवडणूक होवून जवळपास सव्वा महिना लोटला. पण या निवडणुकीचे कवित्व अद्यापही संपले नाही. एकतर्फी झालेल्या या निवडणूकीत “ब’ वर्ग सोसायटी मतदार संघातील लक्षवेधी व चुरशीची लढत “लाखों’च्या उड्डाणामुळे अद्यापही चर्चेत आहे. पण आता या मतदार संघातील एका उमेदवाराच्या “करामतीं’ची चर्चा दणक्यात सुरु आहे.
नागवडे कारखान्याच्या 21 जागांसाठी दि. 14 जानेवारी रोजी मतदान झाले. दि. 15 जानेवारी रोजी मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल घोषित झाला. कारखान्याचे नवे पदाधिकारीही निवडले गेले. पण या निवडणुकीची विशेषतः “ब’ वर्ग सोसायटी मतदारसंघातील लढतीची चर्चा अद्यापही सुरुच आहे. केवळ 41 मतदार संख्या असलेला हा मतदारसंघ निवडणूकीचा आकर्षण ठरला तो यातील मतदारांच्या “लाखों’च्या उड्डाणांमुळे… सुरुवातीला एकतर्फी वाटलेल्या या लढतीत “रंग’ भरला तो “डबल ढोलकी’ मतदार व त्यांचा “भाव’ वाढवणाऱ्या “त्या’ उमेदवाराने. यातूनच काही अफलातून किस्से जन्माला आले. त्याची चर्चा आता खुलेआम सुरु झाली आहे.
सोसायटी मतदारसंघातील त्या उतावीळ उमेदवाराची नस ओळखून शेजारील गावातीलच एका “हवा हवाई’ कार्यकर्त्याने आपल्या “चलाखी’चा खुबीने वापर करीत तेथील मतदाराचा “हवाला’ देत या उतावीळ नेत्याला तब्बल साडे सात लाख रुपयांना चंदन लावत “अंबर’ दाखवल्याची चर्चा जोरात सुरु आहे. नेत्याला “अंबर’ दाखवणारा हा कार्यकर्ता लगेच “भुर्रर्र…’ झाला हे सांगायलाच नको.
तर दुसऱ्या एका प्रकरणात एका मतदाराला “व्याजाला सोकला अन् मुद्दलाला मुकला’चा प्रत्यय आला.
दोन्ही बाजूंची मत”दक्षिणा’ घेतलेल्या या मतदाराने शेवटच्या टप्प्यात एका उमेदवाराची रक्कम परत करुन “स्वाभिमान’ दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या वाट्याला “घोर’ फसवणूक आली. मतदानापुर्वीच पाच लक्ष “मनसबदारी’ मिळालेला हा मतदार मतदानाच्यावेळी उर्वरीत “बिदागी’साठी अडून बसला. मग “बनवाबनवी’त माहीर असलेल्याने त्या मतदाराला त्याच्या बॅंक खात्यात उर्वरीत “षटकार’ ऑनलाईन वर्ग केल्याचे सांगितले आणि तसा पेमेंट ट्रान्सफर मेसेजही स्वतःच्या मोबाईलमध्ये दाखवला.
मनातल्या मनात “खुशीके लड्डू’ फोडीत या मतदाराने मतदानाचा सोपस्कारही पार पाडला. निवडणूक संपली, निकाल लागला अन् “त्या’ मतदाराचे विमान “क्रॅश’ होवून आपोआपच “लॅन्ड’ झाले. त्याला कारणही तसेच होते. जो मेसेज पाहून या मतदाराने मतदान केले होते, तो मेसेजच बनावट होता. त्या मतदाराच्या बॅंक खात्यात “ढब्बू’ पैसाही जमा न करता त्याच्या हातावर “त्या’ नेत्याने तुरी दिल्या. तालुक्यात आता या दोन्ही प्रकारांची जोरदार चर्चा सुरु असून त्यातूनच आता “एकाने केली चोरी.. अन् दुसऱ्याच्या हाती दिल्या ऑनलाईन तुरी..!’ अशी नवीन म्हणच रुढ व्हायला लागली आहे.