मुंबई : मुंबईतील मुलुंड इथल्या नाणेपाडा परिसरातील मोतीछाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती.
‘ग्राउंड प्लस टू’ असे या इमारतीचे स्ट्रक्चर होते. विशेष म्हणजे, ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरी देखील काही कुटुंब या इमारतीमध्ये वास्तव्याला होते. या दुर्घटनेनंतर या इमारतीमधून सर्व कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.
मुंबईच्या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोती छाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे, ही इमारत धोकादायक घोषित करुनही या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती. या दुर्घटनेत इमारतीत राहणाऱ्या देवशंकर शुक्ला (93) आणि आरखी शुक्ला (87) या दाम्पत्याचा या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल रात्री ही घटना घडली. त्यानंतर इमारतीतील सर्व नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई महापालिकेचे पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. अनेक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले यामध्ये वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.