राहाता – नगरपरिषद हद्दीतील कातनाला साठवण तलावाच्या कंपाऊंडजवळ गादीमध्ये कुजलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहे.
शनिवारी सकाळी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख अशोक साठे, आरोग्यप्रमुख विजयकुमार आवारे व रवींद्र बोठे यांना पाणीपुरवठा फिल्टर हाऊसचे पंप चालक रघुनाथ जारे यांनी तलावाच्या कंपाउंडजवळ एका गाठोडे दिसत असून त्याचा वास येत असल्याचे सांगितले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते गाठोडे सोडले.
त्यात माणसांचे पायासारखे हाडे दिसले. ही घटना लक्षात आल्यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी साठे यांनी तात्काळ राहाता पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलीस निरीक्षक काकड यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या गाठोड्याची पाहणी केली असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत २५ ते ३० वर्षाचा तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी घटनेच्या ठिकाणीच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी व पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून मृतदेह मातीत पुरला. स घटनेची माहिती समजतात श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुमे व शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक काकड हे या घटनेचा तपास करीत आहे.