वॉशिंग्टन : सर्वसाधारणपणे कर्करोगासारख्या प्राणघातक रोगाचे निदान करण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. पण आता अमेरिकेतील एका कंपनीने नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून केवळ रक्ताची एक चाचणी करून 50 पेक्षा जास्त प्रकारच्या कर्करोगाचे निदान करणे शक्य होणार आहे. या रक्ताच्या चाचणीचा वापर करून शरीरातील ट्युमरचाही शोध घेता येणार आहे.
अमेरिकेतील ‘ग्रीन’ नावाच्या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे केवळ रक्ताची एक चाचणी करून खूप आधी कर्करोगाचे निदान करणे आता शक्य होणार आहे. ५० वर्षे वयापेक्षा जास्त लोकांना कर्करोगाचा जास्त धोका असल्याने त्यांनी जर ह्या प्रकारे चाचणी करून घेतली तरी त्यांना आधीच कर्करोगाचे निदान करून घेणे शक्य होणार आहे.
या चाचणीच्या मदतीने सर्वच प्रकारच्या कर्करोगाचे निदान होणे झाले आहे. या बाबत प्रसिद्ध झालेल्या एका जर्नल मधील माहिती प्रमाणे रक्ताची चाचणी करून जर कर्करोगाचं निदान झाले तर ते 55 टक्के पर्यंत अचूक असू शकते. शरीरात जर कर्करोग असेल किंवा ट्युमर असेल तर त्यामुळे रक्ताचा जेनेटिक कोड बदलत असतो. या बदलणाऱ्या जेनेटिक कोडची माहिती रक्ताची चाचणी करून मिळू शकतो.
या कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे या रक्ताच्या चाचणीचा वापर करून कर्करोगाचे संकेत निश्चितपणे खूपच आधी मिळू शकतात. सहा हजार दोनशे लोकांवर या रक्तचाचणीची ट्रायल केली आणि ती यशस्वी झाली.
इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस हि सरकारी यंत्रणा ही एक लाख 40 हजार लोकांवर याबाबतचा प्रयोग करणार आहे. जी चाचणी यशस्वी झाली तर कॅन्सर बाबतची भीती मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.