आबूधाबी – आयपीएल स्पर्धा संपत आलेली असताना चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आणि स्पर्धेत रंगत निर्माण केली. आता या स्पर्धेतील आजच्या सामन्यातही चेन्नई किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात करून स्पर्धेतील चुरस आणखी वाढवणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपल्यावर त्यांचे खेळाडू भरात आले व त्यांनी कोलकाताला पराभूत केले. चेन्नईने विजय मिळवला तर प्ले-ऑफ गटात प्रवेश करण्यासाठी सज्ज असलेल्या संघांसमोर संकट निर्माण होणार आहे.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे नेतृत्व दिशाहिन ठरले तर अंबाती रायडू, फाफ डुप्लेसी यांचा अपवाद वगळता त्यांच्या फलंदाजांनी सातत्याने निराशाजनक कामगिरी केली आहे.
त्यात ऋतुराज गायकवाडने काही सामन्यांत चांगली फलंदाजी केली. मात्र, त्यांची ही कामगिरी अशा वेळी सरस झाली की तोपर्यंत त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. पंजाबची फलंदाजी सध्या तरी चेन्नईपेक्षा जास्त सरस आहे.
ख्रिस गेलला दंड
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल याने बाद झाल्याने मैदानावरच बॅट फेकली होती. त्याच्या या गैरवर्तनाबद्दल त्याला सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे.
राजस्थानने या सामन्यात पंजाबचा पराभव केला. या सामन्यात गेल 99 धावांवर खेळत असताना राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने गेलचा त्रिफळा उडवला. शतक हुकल्यामुळे स्वतःवरच संतप्त झालेल्या गेलने आपली बॅट फेकली. त्यामुळे कोणालाही इजा झालेली नसली तरीही त्याची ही कृती खेळाडूंच्या आचारसंहिता नियमाचा भंग करणारी ठरल्याने सामनाधिकाऱ्यांनी त्याला दोषी ठरवत हा दंड केला.