केवाडिया – अहमदाबादच्या साबरमती पासून गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवाडियासाठी सी प्लेन विमान सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सरदार सरोवर धरणाच्या जवळच असलेल्या तिसऱ्या क्रमांकांच्या तळ्यापासून ही दोन इंजिनाची विमान सेवा सुरू करण्यात आली. पंतप्रधानांनी या विमानात बसून या सेवेचे उद्घाटन केले. मोदींनी यावेळी पाण्यावरील या विमानतळाची माहिती घेतली आणि विमान कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
पंतप्रधानांना घेऊन जाणाऱ्या या विमानाचे लॅंडिंग अहमदाबाद मधील साबरमती रिव्हर फ्रंटवर झाले. चाळीस मिनीटांमध्ये या विमानाने दोनशे किमीचे अंतर पार केले. या विमानसेवेसाठी सरदार सरोवर जवळील तिसऱ्या क्रमांकाच्या तळ्याजवळ विमानतळाची इमारत बांधण्यात आली आहे. तेथून प्रवासी ये जा करू शकतात.
अहमदाबादला आल्यानंतर मोदींनी कोनशिलेचे अनावरण करून ही सेवा सुरू झाल्याची औपचारीक घोषणा केली. ही सीप्लेन विमान सेवा स्पाईस जेट तर्फे चालवली जाणार आहे. अहमदाबाद ते केवाडिया या मार्गावर या विमानाच्या रोज दोन फेऱ्या होणार आहेत. या विमान सेवेसाठी एकेरी मार्गाचे तिकीट पंधराशे रूपये इतके ठेवण्यात आले आहे.