पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील हॉटेल्स, फूडकोर्टस्, रेस्टॉरंट ऍन्ड बार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारपासून (दि. 8) सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले ठेवण्यास मुभा दिलेली असून यासंदर्भात बोर्ड प्रशासनाने आदेश दिला आहे.
पुणे महापालिका तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने देखील हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून परवानगी प्रतीक्षा कायम होती. अखेरीस बोर्डाने बुधवारी याबाबतचा आदेश काढला. हॉटेल्स्, फूडकोर्टस्, रेस्टॉरंट आणि बारच्या मालक आणि चालकांना राज्य सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी व्यावसायिकांनी आवश्यक सर्व दक्षता घेण्याची सूचना दिली असून, बोर्डाचे पथक केव्हाही यासंबंधी तपासणी करू शकते. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे नियम आणि अटींचे तंतोतंत पालन हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक-चालकांनी करावे.
हॉटेल, रेस्टॉरंट सहीत अन्य व्यवसायांतील कामगारांची कोविड टेस्ट करण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.