दुबई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगळुरू व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना होत आहे. या दोन्ही संघात पॉवर हिटर्स फलंदाज असल्याने हा सामना याच पॉवर हिटर्समध्ये रंगणार आहे.
दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर त्यात दिल्ली जास्त भक्कम वाटत असली तरीही बेंगळुरूकडून त्यांना धक्का देखील बसू शकतो. कोहलीसह एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल, ऍरन फिंच व शुवम दुबे असे एकापेक्षा एक पॉवर हिटर्स आहेत.
अर्थात आजवर पडीक्कलनेच आपली गुणवत्ता सिद्ध केलेली असली तरीही कोहली व डिविलियर्स हे महान फलंदाज असल्याने ते कधीही आपल्या भरात येऊ शकतात. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांना गाफिल राहून चालणार नाही. त्यांची गोलंदाजीही नवदीप सैनी व यजुवेंद्र चहल या दोनच गोलंदाजांवर सध्या अवलंबून आहे. त्यातील चहलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र, तरीही चहलच्या वेगवान गुगली चंडूंनी या स्पर्धेत भल्या भल्या फलंदाजाना नामोहरम केले आहे.
अॅडम झम्पा, इसुरू उदाना व वॉशिंग्टन सुंदर यांना म्हणावे तसे यश अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कोहलीला गोलंदाजीतही विविधता येण्यासाठी काही बदल करावे लागणार आहेत. वेगवान गोलंदाज डेल स्टेन व फिरकी गोलंदाज पवन देशपांडे यांना संघात खेळवले जाण्याची शक्यता आहे. त्यातील पवनची गोलंदाजी दिल्लीचे फलंदाज अद्याप खेळले नसल्याने तो सरप्राईज पॅकेज ठरू शकतो.
दुसरीकडे दिल्ली देखील आक्रमक फलंदाजीत कमी नाही. पृथ्वी शॉ, शिखर धवन, शेमरन हेटमायर, मार्कस स्टोनिस व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याकडे सामना फिरवण्याची ताकद आहे. धवन व अय्यर यांच्याकडून आता जास्त सरस कामगिरीची त्यांना अपेक्षा आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण राखण्यासाठी धवन व शॉ या जोडीने आक्रमक सलामी दिली तर बेंगळुरू संघाला मोठ्या धावसंख्येचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या गोलंदाजांमध्ये अनरीच नॉर्जे व मार्कस स्टोनिय यांनीच आजवर झालेल्या सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
मात्र, आजच्या लढतीत अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व कागिसो रबाडा यांनाही तोडीस तोड कामगिरी करावी लागणार आहे. अव्वल पिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन दुखापतीतून अद्याप सावरेला नसल्याने अमित मिश्रा याच्यावरच फिरकीची जबाबदारी राहणार आहे.
देशपांडे व पॉलला संधी मिळणार?
बेंगळुरूविरुद्धच्या आजच्या लढतीत दिल्ली संघात अष्टपैलू तुषार देशपांडे व केमो पॉल यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोघांना यंदाच्या स्पर्धेत अद्याप एकाही सामन्यात खेळवले गेलेले नाही. मात्र, फलंदाजी व गोलंदाजी आणखी भक्कम करण्यासाठी त्यांचा संघात समावेश केला गेला तर बेंगळुरूसमोर आणखीनच कठीण आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे कोहलीच्या संघाला जास्त जागरुक राहावे लागणार आहे.