मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली होती. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. परंतु, सुशांतची हत्या नसून ती एक आत्महत्याच असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी आहे. यावरून तसेच हाथरस प्रकरणावरून शिवसेनेने सामना संपादकीयमधून कंगनावर निशाणा साधला आहे.
मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला. रिया चक्रवर्तीने सुशांतला विष देऊन मारले हा ‘बनाव’सुद्धा चालला नाही, पण सुशांत ‘ड्रग्ज’ घेत होता व त्याला ते मिळवून दिले म्हणून अखेर त्या रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले. सुशांतवर मृत्यूनंतर हाच खटला चालवण्याची कायदेशीर व्यवस्था असती तर ‘ड्रग्ज’ प्रकरणात सुशांतवर अमली पदार्थ सेवनाचा खटला चालला असता.
सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय?
ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये, असा कडक इशाराच शिवसेनेने विरोधकांना दिला आहे.