कोल्हापुरात साजरा केला “स्वच्छतेचा अमृत महोत्सवी उत्सव’
छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते 75 व्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी) – स्वच्छतेच्या अमृत महोत्सवी उत्सवानिमित्त आज (दि. 10) संपूर्ण कोल्हापूर रस्त्यावर एकवटलं! निमित्त होतं महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या महास्वच्छता अभियानाच्या 75 व्या आठवडयाचं. आजच्या 75 व्या स्वच्छता अभियान अंतर्गत 6 टन कचरा गोळा करण्यात आला तर 1000 हून अधिक झाडे लावण्यात आली.
आजच्या या अमृत महोत्सवी स्वच्छता अभियानाची सुरवात दसरा चौक येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते जयंती नाला पंपीगस्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक जय पटकारे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, प्रमोद माजगावकर तसेच महापालिकेचे अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर महानगर पालिकेच्यावतीने गेले 75 आठवडे संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान सातत्यपूर्ण सुरु आहे. महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी विशेषत: आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागाने गेली 75 आठवडे शहरात स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्य संपन्न बनविण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे महापालिकेचे स्वच्छता अभियान कोल्हापूरवासीयांनी खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनविली आहे. या अभियानातून शहरातील नद्या, नाले, गटारी, रस्ते, चौक, उद्याने, चौपाटी, घाट आणि फुटपाथ स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहेत.
तसेच, 75 व्या स्वच्छता अभियान अंतर्गत संपुर्ण शहरात मोठयाप्रमाणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा राबविण्यात आला. यामध्ये जयंती नाला पंपीग स्टेशन, झुम प्रकल्प या बरोबर शहरातील मोकळया जागा, मैदाने, पुईखडी अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, जयंती नाला पंपीग स्टेशन येथे नाल्याच्या काठाने मोठया प्रमाणात वृक्षारोपण करुन तो ग्रिन पार्क म्हणून विकसीत करावा, अशी सूचना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी केली.
आजच्या या स्वच्छता मोहिम अंतर्गत शहरातील कावळा नाका ते व्हिनस कॉर्नर, दुधाळी मैदान परिसर, लक्षतीर्थ वसाहत रेणुका मंदिर ते शाहू चौक, गंगावेश ते पंचगंगा घाट, गांधी मैदान, आय टी आय मेन रोड, क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौक, रामानंद नगर मेनरोड, जवाहर नगर मेनरोड, मिरजकर तिकटी , बेलबाग, क्रिडा सकुल, गाडी अडडा, सिध्दार्थनगर ते दसरा चौक, पार्वती टॉकीज ते उमा टॉकीज इत्यादी ठिकाणचा परिसर चकाचक केला. स्वच्छता अभियानामुळे शहरातील 124 चॅनेल तसेच 54 नाले सफाईचे मोठे काम झाले आहे. या अभियानामध्ये 6 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले.
आजच्या स्वच्छता मोहिमेचे एक खास वैशिष्टय म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन स्वत: आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा