पुणे – कोथरुडमधील सर्व्हे नंबर 44 येथील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पासाठी बालभारती ते पौड फाटा हा नियोजित विकास आराखड्यातील रस्ता आणि एचसीएमटीआर रस्ता एकाच ठिकाणावरून घेण्यात यावा. त्यासाठी विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला दिल्या आहेत. यामुळे येथील पुनर्वसन प्रकल्पातील दीड हजार घरे वाचणार आहेत.
कोथरूड येथील सर्व्हे नंबर 44 मध्ये झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये सुमारे साडेतीन ते चार हजार झोपडीधारक आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून या ठिकाणी साडेपाच हजार घरांच्या पुनर्वसन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहेत. मात्र या सर्व्ह नंबर मधून 24 मीटर रुंदीचा एससीएमटीआर रस्ता जातो. तर याच रस्त्यापासून पन्नास ते शंभर मीटर अंतरावरून विकास आराखड्यातील 30 मीटर रुंदीचा नियोजित बालभारती- पौड रस्ता जातो.
या दोन्ही रस्त्यांमध्ये जवळपास सहा ते सात एकर जागा जाते. त्यातून प्रकल्पाला अडचण निर्माण होत असल्याने हे काम थांबले होते. याविषयी शुक्रवारी पवार यांनी बैठक घेतली. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, एसआरए प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निबांळकर उपस्थित होते.
त्यामध्ये एससीएमटीआर हा रस्ता इलिव्हेटेड (उन्नत) आहे. त्यामुळे त्याच रस्त्याच्या खाली बाजूस बालभारती-पौड रस्ता दर्शविण्यात यावा. त्यासाठी विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.