जनजागृतीसह विविध सेवांत सहभाग
पुणे – करोनाविरुद्ध मार्चपासून सुरू असलेल्या लढ्यात देशाचे माजी सैनिकही मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत. या लढ्यात जिल्ह्यातील दहा हजार माजी सैनिक समाविष्ट असून, सुरक्षिततेच्या नियमांचे पालनाबाबत जनजागृती ते करोना विलगीकरण कक्षातील रुग्णांची सेवा अशा विविध कार्यात माजी सैनिक हिरीरीने सहभाग नोंदवत आहेत.
करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संरक्षण दलाच्या वैद्यकीय सेवेतील सेवानिवृत्त आरोग्य अधिकाऱ्यांना मदतकार्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आला. त्यानुसार दलातर्फे माजी सैन्याधिकाऱ्यांकडून ऑनलाइन स्वरूपात सहमती मागविण्यात आली होती. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुण्यातील बहुतांश माजी सैनिकांनी यासाठी आपली सहमती दर्शविली होती. त्यानुसार जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून प्रशासनाच्या मदतीला या माजी सैनिकांना तैनात करण्यात आले आहे.
शहरासाहित भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, दौंड, इंदापूर अशा विविध तालुक्यांमधून मोठया प्रमाणात माजी सैनिक या कार्यात सहभागी झाले होते. सुरवातीच्या काळात एखादा संपर्क क्रमांक शोधणे, सामुदायिक पाळत ठेवणे, विलगीकरण सुविधांचे व्यवस्थापन करणे, टोलनाक्यावर ई-पास ची तपासणी असे विविध काम माजी सैनिकांनी केले.
सध्या करोनाबाबत जनजागृती करणे, सुरक्षिततेच्या नियमाचे पालन करण्यासाठी लोकांना जागरूक करणे, कोविड उपचार केंद्रात समन्वय साधणे यासारखी कामे माजी सैनिक करत असून, सध्या जिल्ह्यातील 10 हजार माजी सैनिक या कार्यात सहभागी असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी मेजर मिलिंद तुंगार(नि.) यांनी दिली.