नवी दिल्ली – उत्पन्न कमी झालेल्या परिस्थितीत कार बाळगणे अवघड झाले आहे. यामुळे कार कंपन्या आहे या परिस्थितीत महसूल मिळावा याकरिता नावीन्यपूर्ण योजना तयार करीत आहेत. काही कार कंपन्यांनी ग्राहकाला नवी कार न खरेदी करता सबस्क्रीप्शनवर देण्याची तयारी सुरू केली आहे.
यामध्ये ग्राहक महिन्याला विशिष्ट रक्कम देतो. त्यानंतर कंपनी देखभाल, विमा याची काळजी घेते.
मारुती सुझुकी कंपनीने अशा प्रकारची सबस्क्रीप्शनवर कार बाळगण्याची योजना दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरिदाबाद, गुडगाव आणि बंगळुरू शहरात सुरू केली आहे. पुढील तीन वर्षात देशातील 60 शहरांत अशी योजना सुरू करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. याअंतर्गत ग्राहक 12 महिने ते 48 महिन्याची सबस्क्रीप्शन निवडू शकतात.
अशा प्रकारची योजना जगभरात चालू असून एकूण विक्रीच्या 5 ते 30 टक्के कार सबस्क्रीप्शन पद्धतीने दिल्या जातात. मात्र, भारतामध्ये अशा प्रकारची पद्धत नवी आहे.