देहूरोड – देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीमधील रहिवाशी व व्यापाऱ्यांनी केलेल्या बांधकामावर कारवाई करू नयेत तसेच नवीन होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय अध्यक्षांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भातील निवेदन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मुख्यबाजार पेठेत व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे करीत मजल्यांवर मजले उभारत त्यावर पत्रा शेड उभारण्याच्या मुद्द्यावरून गेल्या महिन्यात निवेदने, आंदोलन, उपोषण, पत्रकबाजी सुरू आहेत. त्याला अनुसरून कॅंटोन्मेंट बोर्डाने बांधकामधारकांना नोटिसा बजावत एका बांधकाम धारकावर कारवाई केल्यानंतर त्यांना पत्राशेड काढण्यास मुदत देण्यात आली.
यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार शिवसेनेचे शहराध्यक्ष भरत नायडू, रिपाईचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे.
…तर बाजू मांडण्याची संधी द्यावी
देहूरोड परिसरात जुन्या पूर्ण झालेल्या बांधकामावर कोणतीही कारवाई बोर्डाने करू नये. ज्यांना बांधकामाबाबत नोटिसा दिल्या आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी प्रशासनाने द्यावी, असे निवेदन बोर्डाचे उपाध्यक्ष, विद्यमान सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरीने बोर्डाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.