यंदा फक्त 14,585 उमेदवारांचीच नोंदणी : 149 महाविद्यालये यंदा बंद
पुणे – प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डी.एल.एड.) प्रवेशासाठी यंदा केवळ 14 हजार 585 उमेदवारांनीच नोंदणी केली आहे. मागील तीन-चार वर्षांतील प्रवेशाच्या नोंदणीचा विचार करता यंदा हे प्रमाण खूपच घटले आहे. यावरून उमेदवारांनी शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळण्याची खात्री वाटत नसल्याने प्रवेशाकडेच पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा डी.एल.एड.च्या प्रवेशासाठी राज्यातील 591 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयात प्रवेशाच्या 35,864 जागा उपलब्ध आहेत. यात शासकीय-23,605 आणि व्यवस्थापन कोट्यातील 12,259 जागा आहेत. उमेदवारांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्टपासून सुविधा होती. आधी दि.31 ऑगस्ट आणि त्यानंतर 6 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढ देवूनही प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या फारशी वाढलेलीच नाही.
उमेदवारांनी दाखल केलेल्या ऑनलाइन अर्जांची “डायट’च्या स्तरावरुन पडताळणीही करण्यात आली आहे. यात एकूण 10,645 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. आता 10 सप्टेंबर रोजी हरकती, सूचनांसाठी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. प्रथम फेरीतील प्रवेशाची यादी 14 सप्टेंबरला जाहीर होईल. नाव असलेल्या उमेदवारांना प्रवेश घेण्यासाठी 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत मुदत देण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी “डायट’कडे त्यांच्या लॉग-इनमध्ये 17 सप्टेंबरला पाठवण्यात येणार आहे.
…म्हणून निरुत्साह
सन 2012 पासून शिक्षक भरती बंद होती. मागल्या वर्षी ही बंदी हटवण्यात आली. मात्र, करोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली आहे. आर्थिक काटकसर करण्याच्या दृष्टीने शासनाने पुन्हा नवीन पदभरतीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेही उमेदवारांनी डी.एल.एड. प्रवेशासाठी निरुत्साह दाखवला आहे.