लालूंचा मुलगा ऐश्‍वर्याला घाबरला?

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी आपला मतदार संघ बदलला आहे. अगोदर ते वैशाली जिल्ह्यातील महुआ येथून विधानसभा लढविणार होते. मात्र त्यांनी हा निर्णय बदलला असून आता आपण समस्तीपूर जिल्ह्याच्या हसनपूर येथे लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

तेजप्रताप यांनी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी काल येथे एक रॅलीही काढली. दरम्यान, तेजप्रताप यांनी ऐश्‍वर्या राय यांच्या भितीने मतदार संघ बदलला असल्याचे मानले जाते आहे. ऐश्‍वर्या राय हे त्यांच्या पत्नीचे नाव असून त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

ऐश्‍वर्या राय यांचे पिता चंद्रिका राय हे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार होते. लालूंच्या मुलाशी त्यांच्या मुलीचा विवाह झाला, इतकी या दोन नेत्यांमध्ये जवळीक होती. मात्र लग्नानंतर सहा महिन्यांतच तेजप्रताप आणि ऐश्‍वर्या यांच्यात बेबनाव झाला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले आहे. त्यानंतर लालू आणि चंद्रिका राय यांच्यातही वितुष्ट आले असून चंद्रिका राय सध्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात दाखल झाले आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्याकरता तेजप्रताप मैदानात उतरले होते. अगोदर त्यांनी महुआ येथून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र तेथे संयुक्त जनता दलाकडून पत्नी ऐश्‍वर्याशीच मुकाबला करावा लागेल अशी कुणकुण त्यांना लागली अन त्यांनी सुरक्षित मतदार संघाचा शोध सुरू केला.

हसनपूर येथे त्यांचा शोध संपला. या मतदार संघात यादव मतदारांची संख्या मोठी असल्याने येथे आपला विजय पक्का असल्याची खात्री तेजप्रताप यांना वाटते आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारीची घोषणा तर केलीच मात्र रॅलीही काढली.

दरम्यान, तेजप्रताप हसनपूर येथून जरी लढले तरी तेथेही आपली मुलगी त्यांच्या विरोधात रिंगणात उतरू शकते असे चंद्रिका राय यांनी म्हटले आहे. तेजप्रताप आणि ऐश्‍वर्या यांचा विवाह घटस्फोटापर्यंत गेल्यानंतर तेजप्रताप आणि लालूंचे दुसरे पुत्र तेजस्वी यादव ऐश्‍वर्या यांच्या रडारवर आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी आपण रिंगणात उतरायचेच असा निश्‍चय त्यांनी केला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लालूंच्या मुलांनी कुठुनही निवडणूक लढवली तरी त्या दोघांचा पराभव निश्‍चित आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीने केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.